Thursday, March 01, 2007



पारिजातक

‘नाही आधी.. असा इथे माझ्या शेजारी बस.. अन मला सांग पहाटेची स्वप्न खरच खरी होतात का?’ `अरे असा नुसताच हसतोस का? सांग ना.. हो म्हण..’ `बरं बाई.. होतात खरी.. आता तरी सांगशील का..इतक काय स्वप्न पाहिलत ते..’

मी जरा सावरुन बसले- ‘ हे बघ हं अजिबात हसायच नाही.. मी रागवेन हं उगाच थट्टा केलीस तर..’ तु परत हसलास आणि मान हलवलीस.

अरे मी ना आज स्वप्नात आपल घर पाहील.. गावचं.. आपण सुट्टीला गेलेलो तिथे.. अशीच सकाळ होती.. मी आंथरुणात रेंगळलेले .. उठुया ५ मिनिटात असा विचार करत ..इतक्यात तू बाहेरुन आलास.. मी वळणार दाराशी .. तर म्हणालास आधी डोळे मीट.. मी हसले.. अन .. कारण न विचारताच डोळे मिटले.. तू म्हणालास हात कर पुढे.. ‘अरे हे काय सकाळी सकाळी..’ `मी सांगतोय न..कर’ मी ओंजळ धरली.. आणि बघते तर प्राजक्ताची फ़ूलं.. मी पार हरखुन गेले.. शब्दच सुचेनात.. पाणीच तरळल डोल्यात.. आजही आठवत तुला.. लहानपणी मी यायचे तुमच्या घरी फुल वेचायला.. हो मला खूप आवडतो पारिजातक.. सकाळी सकाळी त्याचा अंगणात पडलेला सडा.. ती पांढरी शुभ्र - अन शेंदरी देठाची नाजुक पण टपोरी फुलं.. त्याचा मंद दरवळ.. मी हलकेच ओंजळ जवळ घेतली आणि तो गंध मनात साठवला.. तू नुसताच बघत होतास माझ्याकडे एकटक.. जणु म्हणत होतस अजुनही तू तशीच आहेस इतक्याशा गोष्टिने हरखुन जाणरी.. निरागस..

आणि मग आठवत बसलो आपण आपल लहानपण.. ह्या प्राजक्ताच्या फुलानी तर भेटवल आपल्याला.. तू सुट्टीला आला होतास तुझ्या गावच्या घरी आणि मी आजोळी आलेले.. मामाकडे प्राजक्ताच झाड नाही म्हणुन शेजारच्या ज़ोशींकडे फुलं वेचायल आलेले.. आणि मी फुल वेचताना तू मागुन आलास.. आणि एकदम खडसावलस..- ‘ कोण ग तू? आणि आमच्या झाडची फुलं का घेतेस? आजीला नाव सांगू का?’ मी एकदम गोंधळुन गेले.. अन फुल खाली पडली.. इतक्यात आपला आवज़ ऐकुन आतुन तुझी आजी आली हसत हसतच .. ‘ अरे ही आपल्या देशपांडेंची नात .. सुट्टील आलीय हो तुझ्या सारखीच.. अरे अस फुलाना नाही म्हणु नये.. घे ग बाळ.. आवडतात ना तुला फुल.. खुशाल घे.. नाही ओरडत हो तुला कुणी..’ तू थोडा खट्टु झालास.. पण नंतर आपली छान गट्टी जमली.. बालपण सरल.. दरवर्षी येणरी हक्काची उन्हाळ्याची सुट्टी ही गेली.. पण आपली मैत्री दरवळतच राहीली प्राजक्ताच्या फुलांसारखी.. ग़ावाला नाही यायला मिळाल तरी पत्रातन आपण नेहमी भेटतच राहीलो..

अशीच वर्ष सरली आणि एक दिवस अचानक तू मला म्हणालास मी मुंबैअला येतोय.. तुझ्या घरी.. तू आलास ते मनात काही योजुनच.. येऊन आई-बाबांना भेटलास.. आणि .. महिन्यातच सगळ.. किती लवकर झाल नाही..

आजही मला पारिजात पाहिला की तो दिवस आठवतो.. खरच मला प्राजक्त खुप आवडतो.. आपल्या आयुष्यात येणार्या सुखांसारखा..वाटतो.. तितकाच निरभ्र, तितकाच सुंदर .. तेवढाच सुवासिक.. पण तरिही क्षणभंगुर.. थोड्याशा उन्हानेही कोमेजुन जाणारा.. पण आपण काळजी घेऊ.. अन ही उन्हानाची किरण दूरवरच थोपवुन ठेऊ.. आपण काळजी घेऊ..की आपला प्राजक्त नेहमीच बहरेल.. रोज पहाटे नवा सडा पसरेल.. तू अशीच माझ्या ओंजळीत फुल देशील आणि मी रोज नव्याने हरखुन जाईन.. आपल्या आंगणातच .. नव्हे आपल्या मनात प्राजक्त नेहमीच दरवळेल..